मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ सोमवारी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते आपल्या समर्थकांशी बोलण्यासाठी निघून गेले. भुजबळ राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भुजबळ एखादा मोठा निर्णय घेतात का? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा 15 डिसेंबर रोजी विस्तार झाला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नाही. यामुळे भुजबळ अजित पवारांवर प्रचंड नाराज झालेत. या प्रकरणी त्यांनी अजित पवारांसह सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर जाहीरपणे टीका केली. तसेच ओबीसीच्या मुद्यावरून राज्यभर रान पेटवण्याचा इशाराही दिला. त्यातच त्यांनी ‘जहां नहीं चैना वहां नही रहना’ असे म्हणत एकप्रकारे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचेच संकेत दिले.
या भेटीनंतर छगन भुजबळांनी त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भेटीत नेमकं काय घडलं, याबाबत त्यांनी माहिती दिली. देवेंद्र फडणवीसांना आपण सगळं सांगितलं असून त्यांनी ८ ते १० दिवसांचा कालावधी मागितल्याचं ते म्हणाले. तसेच, ओबीसी समाज नाराज असल्याचं आपल्याला कळतंय आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण नक्की विचार करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भुजबळ म्हणाले.
“मी आणि समीर भुजबळ आम्ही दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात सामाजिक, राजकीय विषयांचा समावेश आहे. काय घडलं, काय चालू आहे त्या सर्व बाबतीत चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की माध्यमांमध्ये मी अनेक गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. त्यानंतर ते एवढंच म्हणाले की यावेळी महायुतीला मिळालेल्या विजयामध्ये ओबीसी समाजाचाही मोठा वाटा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी मलाही आहे, असं ते म्हणाले. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.