नवी दिल्ली – ‘चार धाम प्रकल्प’ अंतर्गत केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे रेल्वे जोडली जात आहे, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.
भारतीय रेल्वे चारधाम क्षेत्रांना जोडण्यासाठी रेल कनेक्टिव्हिटीवर काम करत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे लाखो भाविकांसाठी चारधाम यात्रा सुलभ करणार आहे. उत्तराखंडच्या पवित्र भूमीतील गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथला भेट देण्यासाठी भाविकांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे,” असे ट्विट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.
या संपूर्ण प्रकल्पातील बहुतेक भाग दुर्गम डोंगराळ भागातील असणार आहे. यासाठी रेल्वेला बऱ्याच ठिकाणी बोगदेही तयार करावे लागतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वे मार्ग गंगोत्री आणि यमनोत्रीला जाईल. त्याचबरोबर बद्रिनाथ आणि केदारनाथ लवकरच रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल.