जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात आज (रविवार, २७ जुलै) झालेल्या जळगाव जिल्हा सहकारी नोकऱ्यांची सोसायटी (ग. स. सोसायटी) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ निर्माण झाला. ग.स.सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील वार्षिक अहवाल सादर करत असताना, लोकमान्य गटाचे अध्यक्ष मगन पाटील यांनी त्यांना विरोध दर्शवत माहिती मांडण्यात अडथळा निर्माण केला.
मगन पाटील यांनी व्यासपीठावर जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला असता, विरोधी सहकार गट, प्रगती गट आणि लोक सहकार गटाच्या सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्याजवळील माईक हिसकावून घेतल्याचा आरोप मगन पाटील यांनी केला. ग.स. सोसायटीच्या कर्जावरील व्याज कमी करावे आणि नोकरभरती करू नये, यासह विविध मागण्या व प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असताना सभासदांनी त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप करत त्यांनी सहकार गट, प्रगती गट आणि लोक सहकार गटाचा निषेध व्यक्त केला.

याबाबत बोलताना ग. स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील यांनी सांगितले की, मगन पाटील हे यापूर्वी ग. स. सोसायटीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सुरू असलेल्या बैठकीत त्यांनी प्रास्ताविक करत असताना व्यत्यय आणणे चुकीचे आहे. अनुभवी अध्यक्षांकडून सभेत गोंधळ घालण्याची अपेक्षा नव्हती. दरम्यान, त्यांचे म्हणणे आणि निवेदन स्वीकारले असून, त्यांचे प्रास्ताविक झाल्यावर त्यांना बोलण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी आपले मत मांडले नाही, अशी प्रतिक्रिया अजबसिंग पाटील यांनी दिली.



