लॉकडाऊन काळातील दुकानदारांचा वेळेत बदल करा -– आमदार चिमणराव पाटील

पारोळा  प्रतिनिधी  । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित केलेला आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना  सकाळी खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील जनतेला या वेळेत शहरात येणे शक्य होत नसल्याने  लॉकडाऊन काळातील दुकानदारांचा वेळेत बदल करा अशी  आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.  

 

लॉकडाऊन काळात राज्यशासनाने कडक निर्बंध लावून अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना आपली दुकाने सकाळी ७:०० ते सकाळी ११:०० वा. या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. यावेळेत ग्रामीण भागातून येणाऱ्या असंख्य ग्राहकांची शहरात येण्यासाठी गैरसोय होत असून ते दिलेल्या वेळेत शहरात पोहोचू शकत नाही. अशा वेळेस जीवनावश्यक वस्तूंची  खरेदी न करता ग्राहकांना परत जावे लागत असते. त्यामुळे त्यांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्याच प्रमाणे जीवनावश्यक वस्तूची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची नेमून दिलेल्या वेळेअभावी चांगली धांदल होत असते. त्यामुळे ग्राहकांचा व व्यापारी वर्गाचा समतोल होत नाही. दिलेल्या वेळेत ग्राहक व व्यापारी वर्गाची गैरसोय होऊन एकाच वेळेस जास्त प्रमाणात गर्दी होतांना दिसून येत आहे. तसेच पारोळा व एरंडोल या दोन्ही शहरांना लागून काही ठराविक अंतरांवर बरेच खेडे गाव आहेत. या गावांतील नागरिक शहराला वैद्यकीय, खरेदी, भाजीपाला अत्यावश्यक बऱ्याच गोष्टींसाठी येत असतात. सद्यस्थितीत कोरोना भयावह परिस्थितीमुळे शासकीय व खाजगी वाहनांची ग्रामीण भागातून शहराकडे येणारी रहदारी बंद आहे. सकाळच्या वेळेत खेडे गावाहून शहराकडे येणे शक्य होत नाही. तसेच नागरिकांना, ग्राहकांना व व्यावसायिकांना अनेक अडचणी उद्भवत आहेत. म.जिल्हाधिकारी, धुळे यांनी याची दखल घेत दिनांक २२ मे रोजीच्या आदेशांन्वये धुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक व इतर व्यावसायिक दुकानदारांसाठी दुकाने सुरु ठेवण्याचा वेळेत म्हणजेच सकाळी ७ ते ११ या वेळेत अंशतः बदल करून सकाळी ९:०० ते दुपारी १:०० पावेतो असा बदल केलेला आहे. सदरच्या माझ्या कडे प्राप्त झालेल्या निवेदनामार्फत माझ्या एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा व एरंडोल तालुक्यासह संपूर्ण जळगांव जिल्ह्यात लॉकडाऊन काळातील सुरु ठेवण्यात आलेल्या दुकानांची वेळ सकाळी ०७:०० ते सकाळी ११:०० वाजेपावेतो या दिलेल्या वेळेत अंशतः बदल करून सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० वाजेपावेतो असा करणेसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे मागणी केलेली आहे.

 

Protected Content