चंदूभाऊंच्या भेटीला रक्षाताई : आखजीच्या मुहुर्तावर दिलजमाई !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आ. चंद्रकांत पाटील यांनी रक्षाताई खडसे यांच्या प्रचारात सक्रीय होण्याची घोषणा केल्यानंतर आज स्वत: रक्षाताई या चंदूभाऊंच्या निवासस्थानी पोहचल्या आहेत. याप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी मनोमीलन करत आगामी निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे संकेत दिलेत.

या संदर्भातील माहिती अशी की, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. काही दिवसांपूर्वी भुसावळ येथे झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावल्याने त्यांची नाराजी दुर झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर कालच, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी चंदूभाऊंनी प्रचारात सक्रीय होणार असल्याचे संकेत दिले होते. रक्षाताई आमदार पाटील यांच्या घरी भेट देणार असल्याचे देखील याप्रसंगी पालकमंत्र्यांनी सांगितले होते.

या अनुषंगाने आज अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर रक्षाताई खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. पाटील कुटुंबाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर दोन्ही मान्यवरांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे लोकसभा प्रमुख नंदू महाजन, शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, अफसर खान आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या भेटीनंतर आमदार चंद्रकांत पाटील हे आता रक्षाताई खडसे यांच्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सक्रीय होतील असे स्पष्ट झाले आहे.

Protected Content