अजित पवार गटाच्या आमदाराची मविआ उमेदवाराच्या बैठकीत हजेरी

दिंडोरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ उपस्थित असल्याने महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना महायुतीकडून भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत होणार आहे. दिंडोरीत भास्करराव भगरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.

या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे सकाळी घेण्यात आली होती. या बैठकीत महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ हे मविआचे उमेदवार भास्करराव भगरे यांच्या शेजारी बसून गप्पा मारताना दिसले. यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने झिरवाळ नाराजी असल्याची चर्चा आता रंगली आहे. नरहरी झिरवाळ हे महाविकास आघाडीच्या बैठकीला नेमके का उपस्थित राहिले? याबाबत अजून स्पष्टता नसली तरी हा विषय सध्या चर्चेचा ठरत आहे.

Protected Content