चंपाई सोरेन नवीन पक्ष स्थापन करणार; हेमंत सोरेन यांना मोठा धक्का

रांची-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | झारखंड राजकारणातून खळबळजनक घटना घडली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री चंपाई सोरेन आता नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. आता त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. आम्ही आमची स्वतःची संघटना बनवू. आमच्यासारख्याच विचारसरणीचा नवा जोडीदार मिळाला तर आम्ही त्याच्यासोबत पुढे जाऊ. ही जनतेची मागणी आहे. चंपाई सोरेन यांच्या या घोषणेमुळे सत्ताधारी झामुमोच्या अडचणी वाढू शकतात. कारण चंपाई सोरेन या सोरेन कुटुंबातील खास व्यक्ती आहेत. यामुळेच हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर त्यांनी चंपाई सोरेन यांच्यावर मुख्यमंत्रीपदासाठी विश्वास व्यक्त केला होता. पण, तुरुंगातून बाहेर येताच हेमंत सोरेन यांनी पुन्हा सूत्रे आपल्या हाती घेतली. यावर चंपाई सोरेन यांनी आपला अपमान झाल्याचे म्हटले होते.

८१ सदस्य असलेल्या झारखंड विधानसभेत इंडिया आघाडीचे एकूण ४५ सदस्य आहेत. इंडिया आघाडीची राज्यात सत्ता आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे राज्यात २६ आमदार आहेत. तर, त्यांच्याबरोबर काँग्रेसचे १७, राजदचा एक व कम्युनिस्ट पार्टीच्या एका आमदाराचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला झारखंडच्या विधानसभेत भाजपाचे २४, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक (अजित पवार गट), संयुक्त जनता दलाचा एक आणि एका अपक्ष आमदारासह एनडीएकडे एकूण ३० आमदारांचं संख्याबळ आहे.

Protected Content