तरूणीचा बँक कॅशियरवर चाकू हल्ला

चाळीसगाव प्रतिनिधी । बँकेतील वादातून तरूणीने आपल्या मित्राच्या मदतीने बँक कॅशियरवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील देवळी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये आबासाहेब बाबुलाल राजगिरे हे कॅशियर म्हणून काम पाहतात. सोमवारी दुपारी बँकेची वेळ संपून गेल्यानंतर पेन्शनर खाते धारक मनीषा शिरसाठ ह्या बँकेत आल्या. त्यांनी त्यांची पेन्शन काढण्यासाठी स्लीप भरून ती कॅशियर राजगिरे यांच्याकडे दिली. मात्र, बँकेचे कामकाज बंद झाल्याने रक्कम देता येणार नाही, असे राजगिरे यांनी सांगितले. यावेळी मनीषा शिरसाठ यांची मुलगी प्राची (वय २०) हिने राजगिरे यांना पाहून घेण्याची धमकी दिली.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी बाबुलाल राजगिरे हे चाळीसगाव येथील मालेगाव नाका परिसरातील घरी गेले. रात्री साडेनऊच्या सुमारास प्राची शिरसाठ व तिचा मित्र विशाल शाम जगताप या दोघांनी त्यांना घराबाहेर बोलावले. ते बाहेर येताच प्राचीने हातातील चाकूने राजगिरे यांच्यावर वार केला. राजगिरे यांची पत्नी व मुलगी धावून आल्यानंतर विशाल जगताप याने या दोघांनाही मारहाण केली. यानंतर प्राची शिरसाठ व तिचा मित्र विशाल जगताप यांनी पळ काढला. दरम्यान, या घटनेत बाबुलाल राजगिरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Protected Content