भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांचा आक्रमक पवित्रा; पाच दुकाने केली सील

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील डेली बाजारातील मोकळ्या जागेवर बांधलेल्या पाच गाळ्यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या पथकाने सील केले आहे. मुख्याधिकार्‍यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने संबंधीतांचे धाबे दणाणले आहे.

भुसावळ नगरपालिका प्रशासनाने अलीकडेच शहरातील मरीमाता मंदिराजवळील पालिका जागेवरील बांधकाम पाडले. यानंतर खडकारोडवरील नॅशनल शाळेच्या बाजूला असलेले आठ गाळे सील केले होते. यापाठोपाठ भाजीबाजारातील सार्वजनिक शौचालयाच्या कडेला असलेल्या जागेवरील पाच गाळ्यांना सील ठोकले आहे. संबंधित जागा ही पालिकेच्या मालकीची आहे. या जागेवर परस्पर बांधकाम करून या गाळ्यांची विक्री करण्यात आली होती. दरम्यान पालिकेने या गाळ्यांच्या शटरवर नोटीस चिकटवून संबंधित अनोळखी गाळेधारकांना सात दिवसांच्या आत गाळ्यांचा मालकी हक्क सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा हे अनधिकृत बांधकाम पालिका पाडणार असून, त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.

या कारवाईत मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, कर अधीक्षक रामदास म्हस्के, प्रभारी आरोग्य अधिकारी प्रदीप पवार, वसंत राठोड, गोपाळ पाली, अनिल भाकरे, राजेंद्र चौधरी, जय पिंजानी आदी उपस्थित होते. दरम्यान, सर्व्हे नंबर १५० वरील पालिकेच्या जागेवर बांधलेल्या पाच गाळ्यांना पथकाने सील ठोकले आहे. संबंधितांनी पक्के बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई केली. संबंधितांना पुरावे सादर न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अनधिकृत बांधकामाची गय केली जाणार नसल्याचा इशारा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिला आहे.

Protected Content