पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक येणार

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पूरस्थिती गंभीर बनली असल्यामुळे मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफ पाचारण करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाने याबाबतची मागणी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांचे पाणी नागरी वस्त्या आणि बाजारपेठांमध्ये शिरल्याने हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रात्रीपासूनच प्रशासनाने मदतकार्य सुरू असले तरी आता बर्‍याच ठिकाणी स्थिती गंभीर बनल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणावरून नागरिकांना सुरक्षितपणे काढण्याची आवश्यकता भासत आहे. या अनुषंगाने तहसीलदार अरूण मोरे आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राज्य आपत्ती निवारण विभागाकडे एसडीआरएफच्या दलास पाचारण करण्यात यावे अशी मागणी केली होती.

जिल्हा प्रशासनाची ही मागणी आता मान्य करण्यात आली असून मंत्रालय निवारण कक्षातील अवर सचिव अ.स. फडतरे यांनी धुळे येथील राज्य राखीव दलाच्या महासमादेशकांना निर्देश देऊन चाळीसगाव तालुक्यात मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार आता एसडीआरएफची टीम मदतकार्य करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content