‘ग्राऊंड झीरो’वर आमदार मंगेश चव्हाण ! : पूरस्थितीत मदतकार्यास प्रारंभ

चाळीसगाव, जीवन चव्हाण | शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली असतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट रस्त्यावर उतरून आपल्या सहकार्‍यांसह मदतकार्यास प्रारंभ केला आहे.

चाळीसगाव तालुक्यात काल सायंकाळपासून अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तितूर नदींसह डोंगरी नदीला पुर आले आहेत. दरम्यान पाणी नदीच्या पात्रातून विसर्ग होऊ लागल्याने पुराचे पाणी शहरातील अनेक घरांमध्ये जाऊन पोहोचला आहे. शहरासह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने वेढले आहे. त्याचबरोबर अनेक गावांचे संपर्क तुटल्याने या पावसामुळे जनावरे, शेती औजारे वाहून गेली असून मनुष्यहानी देखील झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान आमदार मंगेश चव्हाण हे पहाटेपासूनच घरातून बाहेर पडून पुरपरिस्थितीची पाहणी करत असून हे अस्मानी संकट असल्याने सर्वांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. शासन, प्रशासनाला सोबत घेऊन सकाळपासून मदत कार्य सुरू असून त्याठिकाणी संपर्क तुटला आहे. अशा ठिकाणांहून काही माहिती असेल तर तात्काळ कळवण्याचे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना केले आहे. तर दुसरीकडे कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून लवकरच वाहतूक सुरळीत होतील असे पोलिस उपनिरीक्षक भागवत पाटील यांनी सांगितले आहे.

Protected Content