चाळीसगाव – जीवन चव्हाण | गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मतदार प्रक्रिया आज येथील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयात पार पडली असून यावेळी ३ हजार तीनशे ४५ पैकी ७८.४४ टक्के मतदान झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मतदान प्रक्रिया येथील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयात दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडली. यावेळी ३ हजार तीनशे ४५ मतदात्यांपैकी २६२४ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामुळे एकूण ७८.४४ टक्के मतदान करण्यात आले. तत्पूर्वी विकास पॅनल, नानासाहेब चव्हाण स्मृती पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात ही लढत होत आहे. १९ जागांसाठी ५१ उमेदवार हे रिंगणात उतरले आहे. उद्याच्या निकालाकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले असून मतदानाच्या दिवशी सर्व पॅनलच्या समर्थकांनी आपापल्या पॅनलच्या विजयाचा दावा केला आहे.
तत्पूर्वी संस्थेच्या जागेवरून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. त्यातच माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी एका व्हिडीओद्वारे खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण हे संस्थेच्या जागेविषयी मला वैयक्तिक भेटल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर खर्याअर्थाने या निवडणुकीला राजकीय वळण लागले. यातून अनेक आरोप-प्रत्यारोप रंगले. त्यात स्मृती पॅनलमध्ये खासदार उन्मेष पाटील यांचे वडील असल्याने विकास पॅनल व स्मृती पॅनलची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्याच्या निकालाकडे तालुक्यासह जिल्ह्याचा लक्ष लागले आहे.