हुश्श ! : पावसाने घेतली उसंत; चाळीसगाव तालुकावासियांना दिलासा

चाळीसगाव जीवन चव्हाण | अतिवृष्टीमुळे काल चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला असतांना रात्रभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर आता पूरपश्‍चात परिस्थितीत स्वच्छता, मदत आणि पुनर्वसनाचे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.

काल चाळीसगाव तालुक्यातील ३२ गावांमध्ये अतिवृष्टीने अक्षरश: हाहाकार उडाला होता. यात प्रामुख्याने चाळीसगाव शहरातून जाणार्‍या तितूर नदीचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. यात घरे आणि दुकानांची पडझड तर झालीच पण शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कन्नड घाटात दरड कोसळल्यामुळे तो मार्ग बंद झाला असून तेथील वाहतूक ही पूर्णपणे दुसरीकडे वळविण्यात आलेली आहे. काल दिवसभर प्रशासनाने मदत कार्यासाठी पुढाकार घेतला. तर लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी करून मदतीची ग्वाही दिली.

काल दिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडतच असल्याने सर्वच जण धास्तावले होते. तथापि, सायंकाळपासून पावसाने बर्‍याच प्रमाणात उसंत घेतली आहे. रात्रभरातून तर तालुक्यात कुठेही मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त नाही. यामुळे बहुतांश ठिकाणी शिरलेले पुराचे पाणी आता ओसरल्याचे दिसून येत आहे. खोलगट भागांमध्ये अद्यापही पाणी साचल्याचे दिसून येत आहे. तर, शेतांमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तालुक्यातून बरीच गुरे वाहून गेली असून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लागली नाही तर रोगराई पसरण्याचा धोका आहे. तर पूरपश्‍चातच्या स्थितीमुळेही रोगराईचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, कन्नड घाटात काल सकाळपासून सुरू असलेले रस्ता मोकळा करण्याचे काम आज सकाळी देखील सुरूच असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एसडीआरएफचे पथक अव्याहतपणे काम करत असल्याने रस्ता मोकळा करण्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र आजही महामार्ग पूर्णपणे खुलणार की नाही ? याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. एकंदरीत पाहता पावसाने उसंत घेतल्याने चाळीसगाव तालुका वासियांना बर्‍याच प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. आता प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content