चाळीसगाव प्रतिनिधी । भाचीच्या विवाहसाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्याच्या घरी चोरट्यानी डल्ला मारत सव्वा दोन लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यात हे कृत्य भाडेकरूनेच केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, दिपक रावसाहेब जगताप (वय- ४७ रा. अयोध्या नगर ता. चाळीसगाव) हे संबंधीत ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून शहर वाहतूक शाखेत पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या भाचीचा विवाह धुळे येथे असल्याने २५ मे रोजी दुपारी १५:३० वाजता घराला कुलूप लावून ते वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांच्याकडे चावी देऊन लग्नासाठी गेले होते.
मात्र लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर २६ रोजी सायंकाळी उशीराच्या सुमारास हे दाम्पत्य घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप हे भिंतीवर ठेवून दरवाजाच्या आतून कडी लावण्यात आलेली होती. दरम्यान दिपक यांनी दुसर्या ठिकाणाहून घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूम मधील लाकडी कपाटातून २० हजार किंमतीची ५ ग्रॅमची बदामाची अंगठी, १६ हजार किंमतीचे ४ ग्रॅमचे कानातील टॉप्स, २० हजार किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे चेन व १ लाख ६८००० हजार रोकड असे एकूण २,२४००० हजार चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत दीपक जगताप यांनी भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळाली. त्याच्यावरच संशय घेऊन दिपक जगताप यांनी लागलीच शहर पोलिस स्थानक गाठून त्याच्या विरूध्द भादंवि कलम-३८०,४५४, ४५७ अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.