चाळीसगावातील भाजप नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील भुयारी गटार योजनेसाठी उपनगराध्यक्षा, अपक्ष नगरसेविका व शहर विकास आघाडीचे नगरसेवक खोडा घालत असल्याचा आरोप करून याबाबत उपोषणाचा इशारा आज भाजपच्या नगरसेवकांनी दिला आहे.

आज आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उपोषणाचा इशारा दिला. ते म्हणाले की, नगरपलिकेत सत्तांतर होऊन भाजपाने विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. यात तब्बल १४७ कोटी रुपयांची भुयारी गटार योजनेस देखील मंजुरी मिळालेली आहे. तथापि, या योजनेच्या कार्यान्वयनासाठी काही जण खोडा घालत आहेत.

चाळीसगावच्या उपनगराध्यक्षा आशाताई रमेश चव्हाण व अपक्ष नगरसेविका सायली रोशन जाधव यांच्यासह शहर विकास आघाडीचे नगरसेवक यात कागदोपत्री अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली असून या प्रश्‍नी निर्णय न झाल्यास भाजपचे नगरसेवक उपोषण करतील असा इशारा घृष्णेश्‍वर पाटील यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला नगरसेवक नितीन पाटील, आनंद खरात, बापू आहिरे, चंद्रकांत तायडे, नगरसेविका विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, भुयारी गटारींच्या प्रश्‍नावरून शहरात राजकारण पेटल्याचे यातून दिसून आले आहे.

Protected Content