चाळीसगावातल्या विराम लॉन्सवर दंडात्मक कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील धुळे रोडवर असणार्‍या विराम लॉन्समध्ये आज सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यानंतर या लॉन्सच्या संचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करू नये असे निर्देशन जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. मात्र तरीही धुळे रोड वरील विराम लॉन्स मंगल कार्यालयात आज लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना चैतन्य तांडा क्र. ४ येथील ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड यांनी कळवले. या अनुषंगाने गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी संयुक्तपणे विराम लॉन्स मंगल कार्यालयावर धडक कारवाई केली.

या पथकाने विराम लॉन्स मंगल कार्यालयाचे मालक ज्ञानेश्‍वर चौधरी यांना दहा हजार रुपयांचे दंड व भादवि. २६९, २७०, १८८ व कलम १,२,३ महाराष्ट्र कोव्हीड-१९ चे नियम ११ नुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. विस्तार अधिकारी आर. आय. पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. तसेच आकारण्यात आलेला दंड दहा हजार रुपये चैतन्य तांडा क्र. ४ ग्रामपंचायतीला देण्यात आले.

या कारवाईप्रसंगी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, विस्तार अधिकारी आर. आय. पाटील, करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड व सदस्य वसंत राठोड उपस्थित होते.

Protected Content