चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज पहाटे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे आगमन झाले आहे.
३० आणि ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ३८ गावांना जबर फटका बसला आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर कन्नड घाटातील वाहतूक अजून देखील सुरळीत झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आधीच नुकसानीची पाहणी केली आहे. काल रात्री उशीरा त्यांच्या दौर्याचा तपशील जिल्हा प्रशासनाने जाहीर केला होता.
या अनुषंगाने आज पहाटे ना. जयंत पाटील यांचे रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीवदादा देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.