चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बँक खातेदारांनी दिलेली तब्बल ६२ लाख ६१ हजारांची रक्कम स्वत:कडे ठेवून घेणार्या एजंटाचा पर्दाफाश झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
देवळी येथील बँक ऑफ बडोदा शाखेने बँक मित्र म्हणजेच एजंट म्हणून म्हणून बिलाखेड येथील नीलेश युवराज शिंदे याची बीसी कोड धारक म्हणून नेमणूक केली होती. शिंदे हा देवळी शाखेत ग्राहकांकडून पैसे स्वीकारून ग्राहकांना बँकेचा सही, शिक्का मारून पावती देत असे. दरम्यान, यातून ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्याने फसवणूक केली.
बँकेचे ग्राहक सुदर्शन पाटील यांनी ३० जून २०२१ रोजी १० लाखांची रोकड बँक खात्यात भरण्यासाठी नीलेश शिंदेकडे दिली. त्याने सही, शिक्क्यानिशी पावती दिली. त्यानंतर आठ दिवसांनी पाटील बँकेत गेले असता त्यांच्या खात्यावर केवळ २ हजार १७२ रूपये शिल्लक असल्याचे आढळले. त्यामुळे सुदर्शन पाटील यांनी नीलेश शिंदे यास १० लाख भरले की नाही, अशी विचारले. त्यावेळी शिंदेने १० लाख खात्यात जमा न करता यातून लोकांचे पीक कर्ज परस्पर भरले, मला ५ हजार रूपये मिळाल्याने मी असे केल्याची त्याने कबुली दिली. मी तुम्हाला पैसे परत करेन, असे सांगून सुदर्शन पाटील यांना त्याने दोन धनादेश दिले. मात्र हे चेक वटले नाहीत. यादरम्यान शिंदे याच्या-विरोधात इतर ग्राहकांच्याही बर्याच तक्रारी आल्या.
या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी केली असता, नीलेश शिंदे याने सुदर्शन पाटील यांच्यासह इतर ग्राहक तसेच बँकेतील बचत गट धारक अशा सुमारे ३१ ग्राहकांची ६२ लाख ६१ हजार ८९१ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर नीलेश शिंदे फरार झाला होता. सपोनि विष्णू आव्हाड यांना नीलेश चाळीसगावात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर सपोनि विष्णू आव्हाड, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण, हवालदार मिलिंद शिंदे, गोरख चकोर, शैलेश माळी, नीलेश लोहार यांच्या पथकाने सापळा रचून धुळे रस्त्यावरून नीलेशला अटक केली. त्याला गुरुवारी चाळीसगाव न्यायालयाने २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.