यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन शशिकला समाधान चौधरी यांना २००१ नंतरचे तिसरे अपत्य असल्याचे कारणावरून अर्जदार विनोद काशिनाथ चौधरी यांचे तक्रारीवरून येथील सहाय्यक दुय्यम निबंधक सहकारी संस्था एस एफ गायकवाड यांनी श्रीमती शशिकला समाधान चौधरी यांना विकासोच्या चेअरमन पदावरून अपात्र घोषित केले आहे.
या बाबत माहिती अशी की ,यावल तालुक्यातील बोरावल विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन शशिकला समाधान चौधरी यांचे विरुद्ध येथील विनोद काशिनाथ चौधरी यांनी ८ ऑगस्ट 20२३ रोजी तक्रार अर्ज सादर करत शशिकला चौधरी यांना अनुक्रमे १) स्वाती समाधान चौधरी (जन्म दिनांक २५ जून १९९७) , प्रीती समाधान चौधरी (जन्म १ जून १९९९) तर तिसरे अपत्य २५ सप्टेंबर २००३ रोजी जन्मास आले असल्याचे पुरावे सादर करत त्यांचे बोरावल विविध कार्यकारी संस्थेचे संचालक पद रद्द करावे अशी मागणी तक्रार अर्जाव्दारे येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल यांच्याकडे केली होती.
सहाय्यक निबंधक कार्यालयाने या तक्रार अर्जावर १२ सप्टेंबर २३, २०सप्टेंबर, १० आक्टोबर, १ नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर, ५ डिसेंबर २३ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणी प्रसंगी शशिकला चौधरी यांचे वकिलाकडून पहिले व दुसरे अपत्याचे जन्मदाखल्यात आईचे नाव भारती असल्याबाबतचा युक्तिवाद करण्यात आला होता. तर तक्रारदार विनोद काशिनाथ चौधरी यांनी राजकीय व्देशापोटी तक्रार दिली असल्याचे सांगून तक्रार अर्ज निकाली काढण्याची मागणी केली होती, मात्र तक्रारदार विनोद चौधरी यांचे वकिलाकडून तीन ही अपत्यांचे नावासमोर पिता म्हणून शशिकला चौधरी यांचे पती समाधान चौधरी असे नमूद असून, समाधान चौधरी यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शशिकला होते मात्र त्या १९९४ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी भारती पाटील यांच्याशी दुसरा विवाह केला व त्या विवाहानंतर भारती यांचे नाव शशिकला असे ठेवण्यात आले, तीन ही अपत्यांची जन्म १९९७ नंतरचे असल्याने आणि समाधान चौधरी यांच्या पहिल्या पत्नी शशीकला यांचे निधन १९९४ मधे झाले असल्याने ही तीनही अपत्य भारती उर्फ शशिकला समाधान चौधरी यांचेच असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
शशिकला समाधान चौधरी यांचे लग्नापूर्वीचे नाव शशिकला असल्याबाबत त्यांचेकडून कोणताही पुरावा सादर केला नसल्याचेही युक्तीवादात सांगण्यात आले. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून तीनही अपत्य शशिकला समाधान चौधरी यांचेच सहा. निबंधक यांना खात्री पटल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ (१) , (७) मधील तरतुदीनुसार अधिनियम २००१ अन्वये एकूण अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त असल्यास सदर व्यक्ती सहकारी संस्थेचे समिती सदस्य म्हणून नामनिर्दिष्ट होण्यास पात्र असणार नाही अशी तरतूद असल्याने सहाय्यक निबंधक एस. एफ. गायकवाड यांनी ८ डिसेंबर २३ चे आदेशान्वये शशिकला समाधान चौधरी यांना अपात्र घोषित केले आहे.