पाचोरा प्रतिनिधी । येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने भाषा सेवा कार्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
त्या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ. किसन पाटील (ज्येष्ठ साहित्यिक) यांनी मनोगत व्यक्त केले. त्या वेळी ते पुढे म्हणाले, “मराठीच्या संवर्धनासाठी बोलीभाषांचा वापर, साहित्य निर्मिती, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, प्रशासकीय कामकाज आणि न्यायालयीन उपयोजनासह मराठी संशोधन, कोश वाङ्मय निर्मिती तसेच प्रसार माध्यमातून मातृभाषेचा उपयोग सतत केला पाहिजे. केवळ भावनिक संवर्धनापेक्षा मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषेचा संवाद संप्रेषणातील उपयोजन व्यवस्था जाणिवपूर्वक जोपासायला हवी. साहित्याची भाषा, व्यावहारिक भाषा आणि प्रशासकीय भाषांतून लोकसंवाद, लोकशिक्षण घडले पाहिजे. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे.” या प्रसंगी प्राचार्य डॉ. किसन पाटील (ज्येष्ठ साहित्यिक) आणि रंगराव पाटील (प्रकाशक) यांचा भाषासेवा, ग्रंथ निर्मिती आणि प्रकाशन व्यवहारातील योगदानाबद्दल प्रतिनिधिक गौरवपूर्ण सन्मान केला. सन्मान चिन्ह, मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडली. उपप्राचार्य शरद पाटील (कनिष्ठ महाविद्यालय) आणि सर्व प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले. प्रा. अधिकराव पाटील, म. सा. प. कार्यकारिणी आणि मराठी विभागाने यासाठी परिश्रम घेतले. या प्रसंगी स्व. ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी विभागाव्दारे आयोजित निबंध स्पर्धेतील संजिदा शेख, शुभम पाटील, प्रतिक्षा भावसार यांना पारितोषिके प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ. पी. बी. सोनवणे, प्रा. पी. आर. सोनवणे, डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. एस. आर. ठाकरे, प्रा. अतुल पाटील, डॉ. बी. एच. पाटील, प्रा.अजय गायकवाड, जावेद देशमुख, घनश्याम करोशिया, एम. पी. जाधव, उमेश माळी, सुरेंद्र तांबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. वासुदेव वले यांनी मानले.