Home Cities जळगाव सीईओ करिश्मा नायर यांची वसंतवाडी अंगणवाडीला भेट

सीईओ करिश्मा नायर यांची वसंतवाडी अंगणवाडीला भेट

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव प्रकल्पांतर्गत वसंतवाडी येथील अंगणवाडी केंद्राला प्रत्यक्ष भेट देत Early Childhood Development (ECD) कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. बालकांचे पोषण, आरोग्य, शारीरिक व बौद्धिक विकासासोबतच कुटुंब आणि समुदायाचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर त्यांनी यावेळी विशेष भर दिला. महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे यावेळी उपस्थित होते.

भेटीदरम्यान करिश्मा नायर यांनी अंगणवाडीतील बालकांचे वजन व उंची स्वतः प्रत्यक्ष मोजून त्यांच्या पोषणस्थितीचे Normal, SAM, MAM, SUW आणि MUW या निकषांनुसार वर्गीकरण करून घेतले. बालकांच्या वाढीचे नियमित मोजमाप करणे, त्यांचे योग्य वर्गीकरण करणे आणि गरजेनुसार वेळेत आवश्यक हस्तक्षेप करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वसंतवाडी येथील बालकांमध्ये Stunting चे प्रमाण कमी असल्याचे पाहणीत आढळून आले. ही सकारात्मक स्थिती कायम ठेवतानाच Stunting चे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच आवश्यक उपचारात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

बालकांचा विकास हा केवळ त्यांच्या शारीरिक वाढीपुरता मर्यादित नसून बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि भाषिक विकासही तितकाच महत्त्वाचा असल्याचे नायर यांनी सांगितले. Early Childhood Development कार्यक्रम अंगणवाडी केंद्रापुरता मर्यादित न ठेवता कुटुंब आणि समुदायाच्या सक्रिय सहभागातून प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.  अंगणवाडी भेटीदरम्यान त्यांनी गरोदर महिला आणि स्तनदा मातांशी जमिनीवर बसून अत्यंत आपुलकीने संवाद साधला. महिलांच्या आहार, आरोग्य, स्तनपान, बालसंगोपन तसेच बालकांच्या वाढीशी संबंधित अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अधिकारी आणि लाभार्थी यांच्यातील औपचारिक अंतर बाजूला ठेवून थेट संवाद साधल्यामुळे महिलांनीही आपल्या समस्या व गरजा मोकळेपणाने मांडल्या. बालकांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य पोषण, कुटुंबाचा सक्रिय सहभाग आणि वेळेवर आवश्यक सेवा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. CBE अर्थात Community Based Engagement अंतर्गत बालकांच्या संगोपनात वडील, आजी-आजोबा तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग वाढविण्याच्या विशेष सूचना त्यांनी केल्या.

बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि भावनिक विकासाची जबाबदारी केवळ आईची नसून संपूर्ण कुटुंबाची आहे, हा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. गावातील नागरिकांनीही बालविकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. नायर यांनी पोषण ट्रॅकर ॲपवरील कामकाजाचाही सविस्तर आढावा घेतला. तसेच Nurture ॲपमध्ये VCDC अंतर्गत नोंद असलेल्या कुपोषित बालकांच्या सनियंत्रणाची स्थिती तपासली. कुपोषित आणि जोखमीतील बालकांची नियमित माहिती घेऊन त्यांच्या प्रगतीनुसार आवश्यक हस्तक्षेप करण्यात यावा, तसेच उपलब्ध डिजिटल माहितीचा प्रभावी वापर करून बालकांच्या पोषणस्थितीत सुधारणा घडवून आणावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

क्षेत्रभेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत त्यांनी ‘निपुण’ ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता तपासली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत त्यांनी शिक्षकांशी चर्चा करून मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला. बचत गटांच्या व्यवसायासाठी आवश्यक सुविधा, अडचणी आणि गरजा जाणून घेत उपलब्ध संधींचा प्रभावी वापर करून विविध व्यवसाय व उत्पन्नवाढीचे उपक्रम हाती घेण्यास त्यांनी महिलांना प्रोत्साहित केले. स्थानिक उपलब्ध संसाधनांवर आधारित उद्योग-व्यवसाय विकसित करून महिलांनी आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर करिश्मा नायर यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून गावातील समस्या आणि स्थानिक गरजा जाणून घेतल्या. बालकांच्या संगोपनात आईसोबत वडिलांचाही सक्रिय सहभाग वाढविणे, बालकांना योग्य पोषण व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि गावकऱ्यांनी बालविकासाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  वसंतवाडी येथील ही क्षेत्रभेट केवळ प्रशासकीय पाहणीपुरती मर्यादित न राहता बालकांचे प्रत्यक्ष पोषण मूल्यांकन, ECD कार्यक्रमाचा आढावा, डिजिटल माध्यमातून सनियंत्रण, शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी, गरोदर व स्तनदा मातांशी संवाद, महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणारी सर्वसमावेशक भेट ठरली.


Protected Content

Play sound