जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करनवाल यांनी जिल्ह्यातील आस्थापनांच्या पाहणीसाठी मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १६ एप्रिल) त्यांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती तसेच घरकुल बांधकाम प्रकल्पांना भेट दिली.
वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहणी दरम्यान स्वच्छतेचा अभाव निदर्शनास आल्यानंतर सीईओ करनवाल यांनी तात्काळ संबंधित सफाई कामगाराचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश दिले. औषध साठा, उपचार पद्धती आणि एकंदर कार्यप्रणालीचा आढावा घेताना त्यांनी आरोग्य केंद्राच्या परिसरात स्वच्छतेसंबंधी उदासीनता दर्शविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पिंपळगाव हरेश्वर व शिंदाड या गावांमध्ये सुरु असलेल्या घरकुल बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयास देखील भेट देत सुरू असलेल्या कामाचा दर्जा व प्रगती तपासली. घरकुल बांधकाम अधिक गुणवत्तापूर्ण व नियमानुसार पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर करनवाल यांनी जिल्ह्यातील विविध आस्थापनांना भेटी देण्याची मोहीम हाती घेतली असून, ग्रामीण भागात सुरू असलेल्या कामकाजावर त्यांचा विशेष भर आहे. मंगळवारी (दि. १५ एप्रिल) त्यांनी भुसावळ तालुक्यातील साकरी व किन्ही गावांना भेट देऊन प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व घरकुल प्रकल्पांची पाहणी केली होती. या दौऱ्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे उपस्थित होते.