Home राजकीय अमित शहा आमच्या पक्षाचे प्रमुख; शिंदे गटाच्या नेत्याचे विधान

अमित शहा आमच्या पक्षाचे प्रमुख; शिंदे गटाच्या नेत्याचे विधान

0
98


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणाचा पारा चांगलाच चढलेला असून महायुतीच्या एकतर्फी विजयामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पराभव पत्करावा लागलेल्या महाविकास आघाडीतील नेते सध्या आक्रमक होत महायुतीवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटामध्ये सध्या शब्दयुद्ध सुरू आहे. नाशिकमध्ये पार पडणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवत म्हटले, “अमित शाह हे राज्यातील तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अधूनमधून रामदास आठवले यांचाही पक्ष चालवतात.”

या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “हो, अमित शहा आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, तर त्याचा त्रास तुम्हाला का होतो? तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधी यांची गळाभेट करत होतात, तेव्हा काय झालं होतं? आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि पुढे जात आहोत.”
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच झालेली भेट देखील चर्चेचा विषय ठरली आहे.

या संदर्भात संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, “ताकद वाढवण्यासाठी आम्ही इतर पक्षांशी संवाद साधत आहोत. एकनाथ शिंदे हे सर्वांशी संवाद ठेवणारे नेते आहेत. ज्यांना स्वतःच्या पक्षाशी काही देणं-घेणं नाही, तेच इतर पक्षांत डोकं घालतात.” उदय सामंत यांच्या संदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, “उदय सामंत हे सक्षम नेते आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत.”

शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यावर टीका करत शिरसाट यांनी म्हटले, “हा निर्धार मेळावा नसून पक्ष बचाव मेळावा आहे. पक्षाला डॅमेज करणाऱ्यांना दूर ठेवण्यात आलं आहे. अमिषा अंधारे यांना वाटतं की त्या पक्षाला जन्म दिला आहे. भास्कर जाधव यांची स्थिती तर पक्षात राहतील की नाही, अशी झाली आहे. या पक्षाचं विसर्जन देखील नाशिकमध्ये होईल.” सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शाब्दिक झटापटीने राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आगामी काळात ही लढाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound