अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद येथील नामांकित शामराव येसो महाजन विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने संपूर्ण विद्यालय दुमदुमून गेले. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीतील तब्बल ५१ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महापुरुषांच्या जीवनकार्यावर ओजस्वी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील या थोर विभूतींच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा आपल्या भाषणातून मांडला. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार आत्मसात करून प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात पुढे जाण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धेच्या दृष्टीने नव्हे, तर समाजप्रबोधनाच्या भावनेतून वक्तृत्व विकसित करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

याच कार्यक्रमात आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. या स्पर्धेत ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून प्रथम क्रमांक पायल ढिवरे, द्वितीय गीतांजली महाजन आणि तृतीय ऋषी महाजन यांनी मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्काऊटच्या ‘खरी कमाई’ उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दर्शन महाजन यांच्या गटाचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक एन. ए. महाजन, एस. जी. महाजन, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, डी. डी. महाजन, सी. एस. महाजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी ईश्वर मिस्तरी आणि कैलास महाजन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. आर. माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. जी. महाजन यांनी केले.



