पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करा

नवी दिल्ली, वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस यावर्षी ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याची भाजपाने तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ‘सेवा सप्ताह’ची घोषणा केली. मात्र, हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन विरोधकांनी केलं आहे.

यंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे. याचबरोबर रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ७० ठीकाणी ७० कार्यक्रम करण्याचा भाजपाचा विचार आहे. तर सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी ट्विटरवर ट्रेण्ड होताना दिसला. त्याचप्रमाणे ट्विटरवर #बेरोजगार_सप्ताह हा हॅशटॅगही वापरला जात आहे.

सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उत्तरेतील राजकारण चांगलेच तापले आहे. मागील वर्षी पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस पक्षाच्या माध्यमातून एक आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर यंदा मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा मानस आहे. हीच गोष्ट लक्षात घेत बिहारमधील सुलेह देव समाज पार्टीचे प्रमुख पियुष मिश्रा यांनी ट्विटरवरुन हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं. यानंतर अनेकांनी #NoMoreBJP आणि #बेरोजगार_सप्ताह हे हॅशटॅग वापरुन ट्विट केलं. त्यामुळेच #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी रात्री भारतामधील टॉप ट्रेण्डींग हॅशटॅगच्या यादीत पाचव्या स्थानी आला होता.

Protected Content