ब्रेकींग : भुसावळच्या डीआरएम कार्यालयात सीबीआयची धाड !; दोघे अटकेत

भुसावळ प्रतिनिधी | येथील रेल्वेचे विभागीय कार्यालय अर्थात डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयच्या पथकाने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यात दोन अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे.

भुसावळ शहरात रेल्वेचे विभागीय कार्यालय अर्थात डीआरएम ऑफीस असून यातून भुसावळ रेल्वे मंडळाचा प्रशासकीय कारभार चालत असतो. याच डीआरएम ऑफिसमध्ये आज दुपारच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने धाड टाकल्याची विश्‍वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. यातील कारवाईचा पूर्ण तपशील समोर आला नसला तरी यात दोन अधिकार्‍यांना लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीशी डीआरएम कार्यालयातील सूत्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या कारवाईत सिनीयर डिव्हीजनल इंजिनिअर एम.ए. गुप्ता आणि मुख्य कार्यालयीन अधिक्षक संजीव रडे या दोन अधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन्ही अधिकारी दोन लाख ४० हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहेत.

मलकापूर येथील एमएनवाय कन्सल्टिंग प्रा.लि. या कंपनीने दोन कामांसाठी निविदा भरल्या होत्या. या दोन्ही कामांसाठी ही कंपनी एल-वन आली. सर्वात कमी दराची निविदा असल्याने या कंपनीला वर्कऑर्डर देण्यासाठी मंडळ रेल अभियंता एम.एल.गुप्ता याने ४ लाख रुपये लाचेची मागणी केली. यातील २ लाख रुपये आधी व उर्वरित २ लाख रुपये कामाचे बिलिंग झाल्यावर देण्याचे ठरले होते. याच दोन कामांसाठी कार्यालयीन अधीक्षक संजीव रडे यांनी ४० हजारांची मागणी केली होती. याबाबत कंपनीने नागपूर येथील सीबीआयच्या एसीबी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात १६ पुरूष अधिकारी व दोन महिला अशा १८ अधिकाऱ्यांनी सापळा रचला.

सोमवारी सकाळी ९ वाजता पथकाने डीआरएम कार्यालय गाठले. सुमारे १०.३० ते ११.३० वाजेदरम्यान दोन्ही अधिकारी डीआरएम कार्यालयात पोहोचले. १२.३० वाजेच्या सुमारास संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधीकडून पैसे घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. सीबीआयच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशीस प्रारंभ केला आहे.

Protected Content