‘द केरला स्टोरी’ला फैजपुरात गालबोट : चित्रपटगृहात दगडफेक

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील चित्रपटगृहात ‘द केरला स्टोरी’ चित्रपट सुरू असतांना दगडफेक करण्यात आल्याने घटना घडल्याने शहरातील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते. पोलिसांनी धाव घेत वातावरण शांत केल्याने अनर्थ टळला.

सध्या सर्वत्र ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या सिनेमाला रसिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असतांनाच याला विरोध देखील होत आहे. अनेक ठिकाणी महिला प्रचंड मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहत आहेत. या अनुषंगाने फैजपुरात देखील या चित्रपटाला मोठा प्रतिसाद लाभला आहे. आज दुपारच्या शो ला देखील मोठी गर्दी उसळली होती.

दरम्यान, चित्रपट सुरू असतांना एका प्रार्थनास्थळातून बाहेर पडलेल्या जमावाने चित्रपटगृहात जोरदार दगडफेक केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. तर, सिनेमागृहातील दगडफेकीचे शहरात देखील पडसाद उमटले. दगडफेक करतांना दोन जण आढळून आल्याने जमावाने त्यांना जोरदार चोप दिला. तर मुख्य चौकात जमावाने रास्ता रोको आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.
या प्रकाराची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्थानकातून एपीआय सिध्देश्‍वर आखेगावकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण निवळण्यास मदत केली. तथापि, शहरात यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर शहरातील तणावाचे वातावरण निवळले असून कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Protected Content