संजय राऊतांच्या पत्राची सीबीआय चौकशी करा – मोहित कंबोज

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरु असणाऱ्या खंडणीच्या रॅकेटसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रात नमूद केलेले बिल्डर्स आणि ईडीच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत, व सीबीआय चौकशी करा, अशी मागणी मोहित कंबोज  यांनी केली. ते  मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेले पत्र एकतर ‘सलीम-जावेद’ची रचलेली खोटी गोष्ट आहे. या पत्रात खरंच तथ्य असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी या पत्रासंदर्भात सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. या पत्रात ईडीच्या  काही अधिकाऱ्यांनी मुंबईतील बिल्डर्सकडून १६० कोटीची खंडणी घेतल्याचे म्हटले आहे. लाच देणारा आणि घेणारा हे दोघेही तितकेच दोषी असतात.

या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही आर्थिक गुन्हे शाखेने  न करता हा तपास सीबीआयकडे सोपवला पाहिजे. संजय राऊत अडचणीत आल्यामुळे ते केवळ हवेत बाण मारतायत का, ईडीच्या अधिकाऱ्यांची खोटी नावं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. या प्रकरणात संजय राऊत यांनी उल्लेख केलेला ईडीचा फ्रंटमॅन जितू नवलानी याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे मोहित कंबोज यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले म्हणजे त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सहमती होती. मग संजय राऊत यांनी पत्रातील माहिती आतापर्यंत दडवून का ठेवली आहे? संजय राऊत सगळी माहिती तपासयंत्रणांना का देत नाहीत? संजय राऊत यांच्या पत्रात उल्लेख करण्यात आलेले अनेकजण तुरुंगात आहेत. मात्र, पत्रात अन्य लोकांची नावे टाकून संजय राऊत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत का? या माध्यमातून संजय राऊत महाराष्ट्रात खंडणीचे नवे रॅकेट सुरु करू पाहत आहेत का, असा सवालही मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.

संजय राऊत हे सुजीत पाटकर आणि अन्य लोकांना वाचवण्यासाठी हे सगळं करत आहेत का? जितू नवलानीचा पैसा ईडीकडे कसा जातो, हे संजय राऊत यांनी इतके दिवस लपवून का ठेवले? ते सगळी माहिती का देत नाहीत? त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात १५ दिवसांत चौकशीचे आदेश द्यावेत. अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ. संजय राऊत यांच्या पत्रात तथ्य नसेल तर आम्ही महाराष्ट्रात केंद्रीय तपासयंत्रणांना बदनाम होऊ देणार नाही, असेही मोहित कंबोज यांनी म्हटले.

Protected Content