कारवाईसाठी फक्त खडसेंचे नातेवाईक आणि मलिकांचे जावई दिसतात का? : संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी |  कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? असा सवाल करत २०२४ नंतर भेटू, तुमच्याही फायली तयार असून तेव्हा भूमिगत होऊ नका असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज दिला आहे.

 

अनिल देशमुख यांना केलेली अटक आणि अजित पवारांवरील प्राप्तीकर खात्याच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. २०२४ नंतर भेटू. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

राऊत पुढे म्हणाले की, कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं. आता ते बिघडवलं जात आहे. त्याची जबाबदारी भाजपवर राहणार आहे. आज ते हे सर्व पाहून टणाटणा उड्या मारत आहेत. पण एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. काही लोकं म्हणतात दिवाळी नंतर असं करू तमूक करू. पण या सर्वांना बाथरुममध्ये तोंडं लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, असा इशारा देतानाच पण करायचे का आम्ही? तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचे का? असा सवाल त्यांनी केला.

आजही अजित पवारांवरांशी संबंधित कंपन्यांवर कारवाई झाली. भाजपचे लोकं जंगलात राहतात का? ते कुठे राहतात? त्यांच्या काहीच प्रॉपर्टीज नाहीयेत? आणि त्या सर्व वैध मार्गाने गोळा केल्या आहेत का? आम्ही ईडीकडे काही माहिती दिली आहे. त्यांना अजून हात लागला नाही. त्यांची बायका मुले कुटुंब हे कुटुंबं आमचे काय रस्त्यावर आहेत. हे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू केलं ना ते त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Protected Content