यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल शिवारातील तापी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी कारवाई करत जप्त केले आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील बोरावल शिवारात असलेल्या तापी नदीच्या पात्रातून बुधवार १३ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून कोणतीही परवानगी न घेता वाळूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अशित कांबळे यांना मिळाली आणि पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे व पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी यांनी धडक कारवाई करत वाळूने भरले ट्रॅक्टर पकडले. त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांनी अशोक कांतीलाल सोनवणे (वय-२२), सागर भगवान पाटील (वय-२६) आणि गोपीनाथ अशोक पाटील (वय-२६) सर्व रा. भानखेडा ता. यावल या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून संशयित तिघांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.