गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे दाखविले आमिष

व्यापाऱ्याला साडेपाच लाखांचा लावला ऑनलाईन चुना !

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टेलिफोन नगरात राहणारे व्यापाऱ्याला रसायन व्यवसायात गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आश्विन केशवलाल पटेल (वय-४०, रा. टेलिफोन नगर जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. २७ नोव्हेंबर ते १० जानेवारी दरम्यान त्यांना फेसबुकवरील व्हिक्टोरिया ओव्हेन यांनी त्यांच्याशी व्हाट्सअप क्रमांकावरून संपर्क साधला. त्यांनी एका रसायन कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन करून आश्विन पटेल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ५ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आश्विन पटेल यांनी शनिवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे करीत आहे.

Protected Content