मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज Exclusive | जनतेसाठी डोकेदुखी बनलेल्या जात पडताळणी समित्यांच्या मनमानीला आता आळा बसणार आहे. या समित्यांचे विद्यमान स्ट्रक्चर बदलून पारदर्शकता आणण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
जात पडताळणी समितीच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या नागरिकांनी मोठी पिळवणूक होत असल्याचे अनेक किस्से आपल्याला ज्ञात असतील. या समितीच्या मुजोरीबाबत अनेकदा मोठ्या प्रमाणात वादंग होऊन देखील यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. आज मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातील चर्चेला उत्तर देतांना या समित्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी महत्वाची घोषणा केली.
याबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, जात पडताळणी समित्या या अनेकांची पिळवणूक करतात. अगदी उच्च न्यायालयाने निर्देश देऊन देखील जात प्रमाणपत्र दिले जात नाही. यासाठी मोठ्या रकमेची मागणी होते. अलीकडेच प्रमाणपत्रासाठी दहा लाख रूपयांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले. तर एका आमदाराला जात प्रमाणपत्रासाठी तब्बल दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती देखील त्यांनी दिली. यामुळे या समित्यांमध्ये पारदर्शकता आणून नवीन समित्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधानपरिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला होता. त्यांनी याबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून कोळी समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केल्याने आता यापुढे कोळी समाजाची जात प्रमाणपत्रासाठी होणारी पिळवणूक थांबेल.
जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी समाजबांधवांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनंत अडचणी येत असून याबाबत अनेकदा आश्वासनांची खैरात करण्यात आली असली तरी कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमिवर, देवेंद्र फडणवीस यांनी आज जात पडताळणी समित्यांच्या मनमानीला आळा घालण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. आता याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.