जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळील दोन दुकानदारांना विक्रेत्याला कुऱ्हाडीचा धाक दाखवत गल्ल्यातील २ हजार ३०० रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रेल्वेस्थानकाजवळ सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर वय ३० रा. शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रेल्वे स्थानकाजवळ चहा विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता सैय्यद ऐहसान हे आपल्या दुकानावर चहा विक्री करत असतांना संशयित आरोपी अजीज खान उर्फ बाबा (पुर्ण नाव माहित नाही) रा. गेंदालाल मील जळगाव हा कार क्रमांक (एमएच १९ बीजे १२२१) ने रेल्वेस्थानकावर आलेला होता. त्यावेळी त्याने हातात कुऱ्हाड घेवून सैय्यद ऐहसान धमकावत गल्ल्यातील १५०० रूपये काढून घेतले, त्यानंतर बाजूला असलेल्या दुकानातील राहुल सुनिल खर्चाने यालाही कुऱ्हाडीचा धाक दाखवत धमकी देवून त्याच्या गल्ल्यातील ८०० रूपये असे एकुण २ हजार ३०० रूपये जबरी हिसकावून चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी अजीज खान उर्फ बाबा (पुर्ण नाव माहित नाही) रा. गेंदालाल मील जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे करीत आहे.