जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियाचा गैरवापर करत न्यायालयात प्रलंबित असलेल्या पोक्सो प्रकरणातील पीडित मुलीची ओळख उघड करणे आणि तिची बदनामी करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील एका भागात राहणारे ६० वर्षीय वृध्द हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांच्या मुलीच्या संदर्भात न्यायालयात पोक्सो अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र, संशयित आरोपी अण्णा दगडू बेलदार रा. लोहारा ता. पाचोरा याने ८ एप्रिल रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत अतिशय बेजबाबदारपणे या प्रकरणाची गोपनीय माहिती एका व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केली.

एवढेच नाही, तर पीडित मुलीची ओळख उघड करून तिची समाजात बदनामी केली. तसेच, या प्रकरणाशी संबंधित खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे पीडित कुटुंबीय मानसिक तणावाखाली आले असून, त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अण्णा दगडू बेलदार रा. लोहारा ता. पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे करीत आहे.



