शिक्षकांना धमकावल्यानंतर दोघांना बेदम मारहाण : अजय जैनसह तिघांविरूध्द गुन्हा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विद्यार्थ्यांनी शिक्षकाला धमकावण्याच्या प्रकरणात विचारणा करण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील कोथळी येथील दोघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी अजय जैन यांच्यासह एकूण तीन जणांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्थानकात काल गणेश विनोद नाफडे ( वय ३०, रा. सातोड, ता. मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिली. यानुसार, जे. ई. स्कूलमधील त्यांचा वर्गात सुमीत गणेश गोसावी या विद्यार्थाशी वाद झाला. यानंतर या विद्यार्थ्याने अरविंद बोदवड, निखील परदेशी आणि मयूर इंगळे ( सर्व रा. मुक्ताईनगर ) या तिघांना बोलावून घेत गणेश नाफडे यांना धमकावले. या प्रकरणी पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार काल म्हणजे दिनांक २६ रोजी सकाळी घडला.

दरम्यान, यानंतर कालच दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोथळी येथील रामचंद्र भगवान पाटील आणि सुहास राणे हे याच प्रकरणी चौकशी करण्यासाठी मुक्ताईनगर बस स्टँड परिसरात गेले होते. दरम्यान, या भागात असणार्‍या अजय जैन यांच्या घरातील अंगणात अरविंद बोदडे आणि वैभव बोदडे बसलेले दिसले. त्यांनी या दोघांना सरांना का धमकावले ? अशी विचारणा केली.

यावर, अजय जैन यांच्या चिथावणीमुळे अरविंद बोदडे आणि वैभव बोदडे यांनी रामचंद्र भगवान पाटील आणि सुहास राणे या दोघांना बेदम मारहाण केली. यात रामचंद्र भगवान पाटील यांच्या डोक्यात लोखंडी स्टूलचा आघात करण्यात आल्याने ते जखमी झाले. तर सुहास राणे यांना देखील खूप मारहाण करण्यात आली. यात रामचंद्र पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

या प्रकरणी रामचंद्र भगवान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अजय जैन, अरविंद बोदडे आणि वैभव बोदडे ( सर्व रा. मुक्ताईनगर ) या तिघांच्या विरोधात भादंवि कलम ३०७, ११४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संदीप चेंडे हे करत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

Protected Content