भरधाव चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

अडावद ता. चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथे भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत गल्लीत भरधाव येणाऱ्या महिंद्रा मॅझिमो ( क्रमांक : MH-39-J-7424) या गाडीने दिड वर्षाच्या प्रियांशी संदिप पाटील या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

२४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुवर्णा संदिप पाटील या त्यांच्या घरासमोर असले दुकानात ताक घेण्यासाठी जात असताना त्यांच्या मागोमाग प्रियांशी रस्ता ओलांडत होती. याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांग्यानिम चौकाच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या चारचाकी गाडीने तिला जोरदार धडक दिली. गाडीच्या पुढील व मागील उजव्या बाजूच्या चाकाखाली प्रियांशी आल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर मयत प्रियांशीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे आरोपी गाडीचालक पंकज अरुण धनगर, ( राहणार कमळगाव, ता. चोपडा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत नाईक करत आहेत.

घटनेनंतर अडावद गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Protected Content