महिला सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भातील ‘तो’ आदेश रद्द

जळगाव, प्रतिनिधी | आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील व उपायुक्त (आरोग्य) मिनीनाथ दंडवते यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे रात्रपाळीसाठी आदेशित केल्याने या दोघा अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याबाबत मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, हा आदेश आज मागे घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे २४ नोव्हेंबर रोजी मागासवर्गीय महिला सफाई कर्मचार्‍यांना बेकायदेशीर आदेश देऊन रात्रपाळीसाठी काम करण्याकरिता आदेशित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना वेठबिगारी सारखे कधीही काम करण्यास बोलवले जाते हे चुकीचे असताना देखील आदेशित करण्यात आले आहे. याची चौकशी होऊन मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे व्यापारी संकुलात लाईट नाही, आजूबाजूला दारूची दुकाने असतांंना महिला कर्मचाऱ्यांचे काम करीत असतांना दारू पिणारे हे भरधाव वेगाने गाड्या चालवतात. यामुळे महिला सफाई कर्मचारी सोबत बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची राहील अशी लेखी हमी मनपा आरोग्य अधिकारी यांनी द्यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांची स्वाक्षरी आहे. यावेळी महिला कर्मचारी देखील उपस्थित होत्या. दरम्यान, या महिला कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा उपायुक्त अजित मुठे यांच्याकडे मांडली असता मुठे यांनी तत्काळ आदेश मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Protected Content