मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी मंत्रिपदाचा पदभारही स्विकारला आहे. बाळासाहेब थोरात यांनी हा तिढा सोडवला असून त्यांनी वडेट्टीवार यांची बोलणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी करून दिली होती. त्यामुळे हा वाद मिटला आहे.
काँग्रेसवर नाही, तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेकडे मदत पुनर्वसन खाते गेल्यामुळे नाराज होतो, असे स्पष्टीकरण कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल आहे. दिल्लीतील नेत्यांशी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलणे करुन दिल्यानंतर वडेट्टीवारांच्या नाराजीचा तिढा सुटला. विजय वडेट्टीवार यांना मदत आणि पुनर्वसन खात्याचा अतिरिक्त भार मिळणार आहे. ‘बी 1’ बंगला या शासकीय निवासस्थानीच वडेट्टीवारांनी आज (शुक्रवारी) ओबीसी आणि खार जमिनी विकास विभागाचा चार्ज स्वीकारला.
माझ्या नाराजीचा विषय नव्हता. काँग्रेसच्या वाट्याला आलेले खाते शिवसेनेकडे गेले होते. मदत आणि पुनर्वसन हे सर्वसामान्य माणसाशी संबंधित खाते आहे. ते शिवसेनेकडे गेले होते, असे विजय वडेट्टीवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. ओबीसी जनगणनेबाबत निर्णय झाला, तेव्हा ओबीसी मंत्रालयाची धुरा सोपवलेले विजय वडेट्टीवार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना तोंड फुटले होते. कुटुंबाचे वैयक्तिक काम होते. मी बाळासाहेब थोरातांना सांगून गेलो होतो. असे वडेट्टीवार म्हणाले.