ग्रामपंचायतच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका घोषित : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीमधील 229 जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार, 22 नोव्हेंबर, 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) ते 6 डिसेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.

मंगळवार, 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार, 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल तर बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना सोमवार, 27 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

रिक्त सदस्य पदांसाठी 12 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली असून सदरची मतदार यादी 18 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींमध्येही प्रसिध्दी केली आहे. जिल्ह्यात पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

Protected Content