जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील सदगुरू बैठक हॉल जवळ एकाचे बंद घर घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून २ लाख ६८ हजार १०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी ६ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता समोर आली आहे. या चोरी प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रविवारी ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश बन्सीलाल पाटील वय-२६, रा. कुसुंबा ता.जळगाव असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सौभाग्य चित्तरंजन सेनापती वय-२८, रा. सदगुरू बैठक हॉल जवळ, कुसुंबा ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून फोटोग्राफीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. २ जुलै सकाळी ६ वाजता ते ६ जुलै रात्री ११.३० वाजेदरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत गावात राहणारा अविनाश पाटील याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ६८ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सौभाग्य सेनापती हे शनिवारी ६ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता घरी आले, तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी गावात राहणारा अविनाश बन्सीलाल पाटील वय-२६, याला रात्री ९ वाजता ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.