बस कंडक्टरकडे आता अँड्रॉइड मशीन, तिकीट काढणे सोपे झाले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील सुमारे १९७६ बस कंडक्टर्सला अँड्रॉई प्रणालीने युक्त तिकिट मशिन वाटपास प्रारंभ झाला असून यामुळे प्रवाशांसह वाहकांच्या डोक्याची कटकट बर्‍याच प्रमाणात कमी होणार आहे.

जळगाव विभागाचा उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्यानंतर देखील एसटी वाहक तिकीट मशीन नसल्याने त्रस्त झाले होते. एसटी संयुक्त कर्मचारी समितीने यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाला पत्र देखील दिलेली होते. जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी मुंबई येथे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे विभागातील जवळपास १९७६ कर्मचार्‍यांना अँड्रॉइड मशीन वाटप सुरू झालेली आहे.

यापूर्वीचे ट्रायमॅक्स मशीन वारंवार खराब होत असल्यामुळे एसटी वाहकांना तिकिटाचा मॅन्यूअल ट्रे वापरावा लागत होता. एसटी महामंडळाच्या विविध सवलती देताना प्रत्येक प्रवाशास मोठ्या प्रमाणात तिकिटे मोजून द्यावी लागत होती. यासाठी एसटी कर्मचार्‍यास भरपूर तारेवरची कसरत करावी लागत होती. बर्‍याचदा एसटी वाहकावर मार्ग तपासणी दलाकडून केस होण्याचे देखील प्रकार झाले होते. एकंदरीत ट्रे बुकिंग ची सवय नसल्यामुळे बहुतांशी वाहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार झाल्यामुळे मुंबई कार्यालयाने याची दखल घेतली व जळगाव विभागातील एसटी वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट मशीन देण्याबाबत स्पष्ट आदेश करण्यात आले. या अँड्रॉइड तिकीट मशीन मुळे एसटी वाहकाला तिकीट बुकिंग करण्यासाठी लागणारा वेळ हा मर्यादित स्वरूपात राहील. झटपट तिकीट बुकिंग झाल्यामुळे प्रवासी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी वाहकाला अतिरिक्त वेळ मिळत जाईल. त्याचप्रमाणे या तिकीट मशीन मध्ये अँड्रॉइड मोबाईल प्रमाणे विविध सुविधा असल्यामुळे प्रवासी एटीएम व इतर पच्या माध्यमातून वाहकास तिकिटाचे पैसे देऊ शकतील.

या संदर्भात जळगाव आगारात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव विभागाचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप बंजारा व संदेश क्षिरसागर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ पाटील यांनी केले. तर एसटी वाहकांना तिकीट मशीन वाटप विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित एस.टी. वाहकांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. जळगाव आगारात जवळपास २५० तिकीट मशिनींचे वाटप झाले.

Protected Content