धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचपूरा येथील शेतकऱ्याच्या घरातून २ लाख ३४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, प्रकाश पांडुरंग पाटील (वय-५९) रा. चिंचपुरा ता. धरणगाव हे शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २१ जुलै रोजी रात्री १० ते सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटा घराच्या पाठीमागील दरवाजा उघडून घरात ठेवलेले ४ हजार रूपये किंमतीचे ५ भार चांदीचे दागिने, २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने आणि १ लाख रूपयांची रोकड असा एकुण २ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.