घरफोडीतील चोरट्यांना अटक; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील शिवाजी चौकातील भवानी ट्रेडिंगच्या बाजूला झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

चाळीसगाव शहरातील शिवाजी चौकात १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान घरफोडी झाली होती. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तांत्रिक पुरावे जमा केले होते. तपासादरम्यान, चाळीसगाव येथील साजनसिंग टाक याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले.

साजनसिंग टाक याचा साथीदार प्रेमसिंग रामसिंग टाक (वय-५०, रा. इनपुन पुनर्वास, ता. पुनासा, जि. खंडवा, मध्य प्रदेश) हा निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर चाळीसगावातून साजनसिंग रुपसिंग टाक (वय -५०, धंदा मजुरी, रा. बसस्टँडमागे, चाळीसगाव) याला ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली.

आरोपींकडून १ लाख ९३ हजार रुपये रोख, ५ लाख १० हजार रुपये किमतीचे ५९.५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ लाख १५ हजार रुपये किमतीचे १ किलो ३७४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ८ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी प्रेमसिंग रामसिंग टाक आणि साजनसिंग रुपसिंग टाक यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या पथकाने केली कामगिरी
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शेखर डोमाळे, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, मुरलीधर धनगर, राहुल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, प्रियंका कोळी, दीपक चौधरी यांनी केली आहे.

Protected Content