पाचोरा प्रतिनिधी । युट्युबवर बुलेट गाडीचे हँडल लॉक तोडण्याची माहिती मिळवून या वाहनाची चोरी करणार्याला पोलिसांनी गजाआड केले आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
पुनगाव रोडवरील स्वामी समर्थ मंदिराजवळील रहिवासी योगेश खंडेराव बोरसे यांची एमएच.१९-सीएच.९९९३ क्रमांकाची बुलेट चोरीला गेली होती. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली असता जारगाव येथील रहिवासी सूरज उर्फ भुरा भगवान पाटील (वय २०) याने संबंधीत बुलेट चोरून ती रांजणगाव (गणपती) येथे विकून टाकल्याची माहिती मिळाली होती. तो फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, तो गावी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल सोनवणे व दीपक सुरवाडे यांनी त्याला गजाआड केले. तर, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस तपासणीच्या दरम्यान सूरजने आपण बुलेट चोरी करण्यासाठी हँडल लॉक तोडण्याचे तंत्र हे युट्युबवरून शिकल्याची माहिती दिली.