ब्राऊन शुगर प्रकरण : संशयित महिलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव/भुसावळ प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शनिवारी कोट्यावधी रूपयांची ब्राऊन शुगरसह एका ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली होती. आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात अजून काही धागेदोरे उघडण्याची शक्यता आहे.

 

यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात ब्राऊन शुगर (हेरॉईन)ची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाई करत शनीवार १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धडक कारवाई करत  सुमारे १ कोटी रूपये किंमतीचे अर्धा किलो ब्राऊन शुगर (हेरॉईन) जप्त केले. या प्रकरणी संशयित आरोपी महिला अख्तरी बानो अब्दुल रऊफ (वय-४५, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) या महिलेला अटक करण्यात आली होती. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. महिलेला ब्राऊन शुगरचा पुरवठा करणारा मध्यप्रदेशातील  संशयीत सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्यप्रदेश) याला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी अटक केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून यातून जिल्ह्यात यापूर्वी ब्राऊन शुगरची झालेली वाहतूक तसेच खरेदी-विक्री करणार्‍यांची नावे देखील समोर येण्याची शक्यता आहे.

 

ब्रेकींग : ब्राऊन शुगर प्रकरणातील म्होरक्या देखील अटकेत

दरम्यान अटक केलेल्या संशयित आरोपी महिला अख्तरी बानो अब्दुल रऊफ (वय-४५, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) हिला भुसावळ  अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोलारे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपीतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल तर सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी बाजू मांडली. यावेळी तपासाधिकारी सपोनि शीतलकुमार नाईक उपस्थित होते.

 

Protected Content