वाहन चोरी करणारी टोळी गजाआड

अमळनेर प्रतिनिधी | ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच पाण्याचे टँकर चोरून विल्हेवाट लावणार्‍या, अवधान, धुळे व मालेगाव येथील टोळीला पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी अमळनेर पोलीस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाहन चोरी करणार्‍या टोळीच्या अटकेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ढेकू रोडवरील रोहन वाडिले यांची ८० हजार रुपयांची ट्रॉली (क्र. एम.एच.१८-एन.८३०५) चोरट्याने, धुळे रोडवरून २६ ऑगस्टला चोरली होती. ही ट्रॉली विक्रीसाठी सोशल मीडियावर उपलब्ध असल्याची माहिती पोलिस बापू साळुंखे, सुनील हटकर व पोलिस नाईक मिलिंद भामरे यांना मिळाली. त्यांनी मनमाड, नांदगाव येथून याबाबत खात्री केली. संशयित जगन्नाथ रामदास पवार (वय २१, रा बल्लाणे, ह.मु.अवधान, ता.जि.धुळे), राहुल पांडुरंग भिल (वय २०,रा.इंदिरानगर, अवधान) यांना अटक केली. त्याने पोलीस चौकशीतचोरलेले ट्रॅक्टर, टँकरची कबुली दिली. उत्तम भास्कर पाटील (रा.अवधान) याचाही सहभाग असल्याचे सांगितले. यासोबत चोरीचा मुद्देमाल विकत घेणारे मालेगावचे भंगार व्यवसायीक शकीलखान खलील खान व अमीन शेख अब्दुल्ला शेख यांनाही अटक केली.

ही टोळी धुळ्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच पाण्याचे टँकर चोरून विल्हेवाट लावत असे. या टोळीकडून सव्वापाच लाख रुपयांचे ट्रॅक्टर, दोन टँकर, ट्रॉली व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाअसल्याचे रमेश चोपडे यांनी सांगितले. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलिस तपास करत असल्याचेही अप्पर पोलीस अधिक्षक म्हणाले.

दरम्यान, या टोळीचा छडा लावणार्‍या पथकाचा पोलिस अधीक्षकांनी सत्कार करून पथकाला पारितोषिक दिले जाणार अशल्याचे अप्पर अधीक्षकांनी यावेळी सांगितले.

Protected Content