ब्रेकींग : रावेरात दगडफेक; वातावरण नियंत्रणात

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ कडेकोट बंदोबस्त लावत टवाळखोरांचा तपास सुरू केला आहे. यामुळे वातावरण नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, उद्या अयोध्या येथे भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. याचे औचित्य साधून आज शहरातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. थोडा वेळापूर्वीच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी या शोभायात्रेला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी पूजन करतांनाच वाजंत्रीच्या तालावर ठेका देखील धरला.

दरम्यान, यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास ही शोभायात्रा भोईवाडा परिसरातून पुढे नाला भागात येत असतांना अज्ञात टवळाखोरांनी किरकोळ दगडफेक सुरू केली. यामुळे शोभायात्रेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या शोभायात्रेच्या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त होताच. यामुळे येथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ दगडफेक करणार्‍यांचा शोध सुरू केला आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शोभायात्रा थांबविण्यात आली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तर, कुणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास न ठेवता कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी रावेरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर रावेर येथील सहायक पोलीस निरिक्षक श्री. अडसूळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे. जनतेने समाजमाध्यमातून अफवा न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content