ब्रेकींग : भरधाव डंपरने दुचाकीवरील तिघांना उडविले; एक ठार, तीन जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते नशिराबाद रोडवरील राणे हॉटेलजवळ आज (गुरुवारी, १५ मे) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास एका भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगात आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील रहिवासी तेजस युवराज बिऱ्हाडे (वय २२) हा त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे (वय १९) आणि मित्र अजय अफलातून सपकाळे (वय २२) यांच्यासोबत गुरूवारी १५ मे रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून नशिराबादहून जळगावकडे येत होता. त्याचवेळी जळगावकडून नशिराबादकडे जाणाऱ्या एका भरधाव डंपरने अचानक विरुद्ध दिशेने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तेजस बिऱ्हाडे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे आणि मित्र अजय सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले.

या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच तेजस आणि तुषार यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच आक्रोश केला. रुग्णालयातील वातावरण यामुळे अत्यंत शोकाकुल झाले होते.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अपघात घडवणारा डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.