ब्रेकींग : शरद पवारांनी निर्णय फिरवला ! अध्यक्षपदावर राहणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संभ्रमाच्या पार्श्‍वभूमिवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा असा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार हे सायंकाळी साडे पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करतील असे जाहीर करण्यात आले.

या अनुषंगाने आज सायंकाळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका जाहीर केली. याप्रसंगी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आदींसह अन्य नेत्यांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मी अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तब्बल ६६ वर्षाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कारकिर्दीनंतर या क्षेत्रातून मुक्त व्हावे अशी माझी इच्छा होती. परंतु, या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना उसळल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेल्या जनतेत अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक व चाहत्यांनी एकमुखाने आवाहन केले. यासोबत देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून वेगवेगळ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील मी अध्यक्षपदाची जबाबदारी सोडू नये असे सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले की, मी जनमानसाच्या भावनेचा अनादर होऊ शकत नाही. आपण जसे प्रेम आणि विश्‍वास दाखविला ते पाहून मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय घेतल्याने आपण याचा मान राखत आहे. यामुळे आपण आपला निर्णय मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारत आहे अशी घोषणा शरद पवार यांनी याप्रसंगी केली.

Protected Content