भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील महादेव माळ फाटा ते मांडवा दिगर दरम्यान एकाची दुचाकी अडवून बंदुकीचा धाक दाखवत ११ लाख ७ हजार ७४२ रुपयांची रोकड जबरी चोरी केल्याची घटना बुधवार ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. या प्रकरणी गुरुवार ४ एप्रिल रोजी अज्ञात तीन जणांवर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भीमराव लक्ष्मण तायडे वय-४४ रा. दत्तात्रय चैतन्य नगर, जामनेर हे कामाच्या निमित्ताने बुधवारी ३ एप्रिल रोजी भुसावळ शहरात आले होते. काम आटोपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ येथून जामनेर येथे जात असताना महादेव माळ फाटा ते मांडवा दिगर दरम्यान रस्त्यावर अज्ञात तीन जणांनी त्यांची दुचाकी आडविली. त्यांना बंदुकीचा धाक दाखवत सुमारे ११ लाख ७ हजार ७४२ रुपयांची रोकड असलेली पिशवी जबरी हिसकावून लूटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या संदर्भात गुरुवार ४ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजता अज्ञात तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे करीत आहे.